गेले ते दिवस
सहामाहि परीक्षा संपली की दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागायचे. तसेच किल्ल्याचेही. मीत्रमंडळीत चर्चा सुळरु व्हायची. माती आणायला नदीकाठी कधी जायचे. कुणी कुणी जायचे? कुणी म्हणायचे मी नाहीय किल्ला करायला ...परवा आजोळी जातोय. दुसर्याला लगेच आठवायचे... अरे मी पण मामाकडे जाणार आहे. तीथे आम्ही शेतात किल्ला करणार! मग घरासमोर किल्ला चांगला कि शेतातला चांगला यावर गहन चर्चा.
किल्ला बनायला सुरु झाला की बाबांपुढे फटाके आणायची भुणभुण सूरु. मग एक दिवस सख्खे चुलत मावस सगळ्याची वरात फटाके आणायला. बाबा काका मामा याना घरुन सुचना होत्याच की मोठे फटाके बाँब नाही द्यायचे. एकतर जीवाला घोर आणी दुपारच्या झोपेच खोबर. तरी फटाके यायचेच. मग त्याची वाटणी त्यात वाद ती मजा औरच.
दिवाळीच्या फराळाची देवाण घेवाण. थंडीत ते तेल उटण खसाखसा चोळुन देणारी आई काकू. ती ओवाळणी ती भाऊबीज.....
गेले ते दिवस.....
दिवस पुढे गेले. आता काॅलेजच्या हाॅस्टेल रुममधे चर्चा ....पाम येताना आउच्या हातचा बेसनाच्या लाडूंचा डबा नसेल तर रुममधे एंट्री नाही हां आताच सांगून ठेवतो. अरे ए लाडू ठेव बाजूला ...इथे टर्म सुटेल की नाही याच टेन्शन आहे. उगाच पिक्चरला गेलो यार आणी रीविजन राहिली न आता हे टेन्शन.
घरी पोराला हाॅस्टेलवर नीट जेवणखाण मीळत नाही म्हणून लाड. आवडीचा फराळ आवडीच जेवण. चील्यापील्यांची भुणभुण...ए दादा किल्ला करायचाय मदत करना! मावळे आणायचेत थोडे पैसे दे ना! भावा बहिणीबरोबर मीत्रांसह दिवाळीची मजा औरच......
गेले ते दिवस......
दिवस आणखी पुढे गेले. नोकरी लागली...लग्न झालं... मुलं झाली.... रोल रीवर्सल झालं. आता मुलं फटाक्यासाठी भुणभुण करायला लागली. किल्ला बनवायचा प्लॅनींग करायला लागली. फरक होता. आता चुलत मावस भावंड गल्लीतले मीत्रमैत्रीणी नव्हत्या. फक्त सौसायटीतली मुलं होती. आता फरक होता कोणी कोणाकडे जात नव्हते जात होते Diwali Greeting Cards. दिवाळी फराळ घरापुरता बनू लागला. जास्तीची गरज लागली तर ग्राहकपेठ जवळच होती. दिवाळीत नातेवाईक मीत्र नाही पण दोघांच्या office मधील लोकाना आमंत्रण जाऊ लागली. दिवाळी आता फक्त दोन दिवसांची झाली कारण लागून सुट्या मीळाल्याने फमीली ट्रीप व्हायची. थोडी आंबट... थोडी गोड ...पण दिवाळी साजरी व्हायची.
गेले ते दिवस.....
दिवस आणखी पुढे गेले. आता दोघेहि रिटायर झाले. मुलं नोकरी व्यवसायानिमीत्त बाहेर गेली. आता दिवाळी फराळ हा ग्राहकपेठ किंवा घरगुती बनवणार्याकडून येतो. थोडा घरच्यासाठी बराचसा मुलाना पाठवण्यासाठी. तसही गोड तेलकट तळलेल खाण्यावर निर्बंध आलेलेच असतात. तरीहि... Wharsapp वर हॅप्पी दिवाळी पाठवतात सर्वाना..नातेवाईकाना मीत्रमैत्रीणीना....
आता आकाश कंदील लावणे हे एक कठीण काम असत. स्टूल ओढून तो विचार करत असतो तर मोबाईल वाजतो...बाबा... नाही मी मी बोलणार.... आबा आम्ही उद्या येतो. सुट्टी लागली. आईला पण सुट्टी...नी बाबाला पण.....
तो टुणकन स्टुलावर चढतो. कंदील लावतो. पणत्या शोधतात दोघे...
दिवस जातच असतात......दिवाळी येतच असते.....ती आनंद देतच असते....आपणच ठरवाच की काय म्हणायच.....
गेले ते दिवस......की.........
आली दिवाळी........
ही दिवाळी तुम्हा आम्हा सर्वाना सुख समृद्धि नी आनंदाची राहो. शुभ दिपावली!!!!!!!!!!